काल रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोध मोहिमेबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष केवळ नावाने वेगळे असले तरी काम मात्र दोघांचेही एकच आहे—राजकारणाच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवणे.
छत्रपती संभाजीराजेंनी सत्ताधाऱ्यांच्या ढोंगी कार्यशैलीवर उघडपणे हल्ला चढवला. “शिवस्मारक ही केवळ एक प्रतीकात्मक योजना बनून राहिली आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात अशा अनेक प्रकल्पांचे केवळ भूमिपूजन होते, परंतु प्रत्यक्षात काहीही घडत नाही. कितीतरी वेळा शिवस्मारकाचा उल्लेख निवडणुकीच्या रणधुमाळीत होतो, परंतु आजतागायत कोणतीच ठोस कृती दिसलेली नाही.
हे शिवस्मारक फक्त एक राजकीय मोहरा ठरले आहे का? जनतेच्या मनात असलेला हा प्रश्न संभाजीराजेंनी कडाडून मांडला आहे. कितीतरी वर्षांपासून शिवस्मारकाचं स्वप्न जनतेला दाखवलं जात आहे, परंतु आजही ते अपूर्णच आहे. प्रत्येक निवडणुकीत या स्मारकाचं नाव पुढे करून भावनांशी खेळ चालू आहे, परंतु प्रत्यक्षात या स्मारकाच्या संदर्भात कोणतीही स्पष्ट प्रगती झालेली नाही. हे सांगताना संभाजीराजे यांनी सत्तेत असलेल्या नेत्यांना आणि विरोधकांना एकाच मापाने तोलले.
त्यांनी पुढे सांगितले की, “शिवस्मारक फक्त एक स्मारक म्हणून नको, ते आपल्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. मात्र, ज्या पद्धतीने आजच्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी त्याचा वापर केला आहे, त्यातून जनतेच्या स्वाभिमानाचा अपमान होत आहे. त्यांच्या या ढोंगी वृत्तीमुळे जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे.”
छत्रपती संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होईल, असे दिसते आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले की, महाराष्ट्रातील जनता आता सत्ताधाऱ्यांच्या नौटंकीला कंटाळली आहे आणि ती परिर्वतनाची वाट पाहत आहे. जनतेच्या भावनांचा खेळ आता संपला पाहिजे, असा ठाम आणि आक्रमक संदेश त्यांनी दिला आहे.
शिवस्मारकाच्या बाबतीत ही मोहीम एका निवडणूक मोहिमेतून पुढे गेलेली दिसत नाही, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. “निवडणुकीच्या वेळी मोठ्या घोषणा करायच्या, मोठे वायदे करायचे, आणि नंतर पुन्हा काहीच न करण्याचं धोरणं या नेत्यांनी अवलंबलं आहे. अशा नेत्यांची आता जनतेने खरं वाजवण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
अशा स्थितीत महाराष्ट्रातील जनता आता विचार करेल का? आगामी निवडणुकीत विरोधात मतदान करून सत्तेत बदल घडवेल का? संभाजीराजेंनी दाखवलेला हा परखड आरसा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन दिशा दाखवू शकतो.