🏆 "अभिराज फाउंडेशन"ची किमया – गुजरातच्या "साद प्रतिसाद" स्पर्धेत उत्कृष्ट संस्थेचा सन्मान!
गुजरात, ११ नोव्हेंबर २०२४: सूरत येथे 7 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित "साद प्रतिसाद" या विशेष स्पर्धेत अभिराज फाउंडेशन संस्थेने आपली अमीट छाप उमटवली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते घेतलेल्या या स्पर्धांमध्ये देशभरातील 22 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती, मेमरी गेम आणि नाट्य स्पर्धा यांचा समावेश होता.
अभिराज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हे नाटक सादर केले आणि इतर विविध स्पर्धांमध्येही आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेला उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत रविकांत बालवडकर, आरुष धायगुडे, समर्थ शेटे, संतोष कोळी, शिवानंद मणिकरी, रोहन वैद्य, समृद्ध गायकवाड, आणि गणेश ढोकळे या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. या यशासाठी शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन होते. स्पर्धेच्या वेळी विकास जगताप, धनंजय बालवडकर (पालक प्रतिनिधी) आणि संस्थेचे सल्लागार अभिजीत तांबे यांनी विशेष मार्गदर्शन केले, तर योगेश आढले, दीपक गाढवे, आणि कुणाल गायकवाड यांनी सहकार्य केले.
या अभूतपूर्व यशाबद्दल अभिराज फाउंडेशनच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण, डायरेक्टर सौ. स्वाती अभिजीत तांबे आणि श्री रमेश आनंद मुसूडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.