घाटकोपर | प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिकेच्या एन वॉर्डातील विविध विभागांमध्ये दीर्घकाळापासून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी एक निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणाऱ्या या कामगारांना अद्यापही नोकरीचे स्थैर्य प्राप्त झालेले नाही. संविधानातील कलम 14, 16, 21 आणि 23 नुसार समानतेचा अधिकार, सार्वजनिक रोजगारातील संधींची समानता, जीवनाचा सन्मानाने जगण्याचा हक्क आणि बळजबरीच्या मजुरीवर बंदी या तत्त्वांवर आधारित ही मागणी सादर करण्यात आली आहे.
कामगार संघटनांनी सादर केलेल्या मागण्यांमध्ये पुढील मुद्दे अग्रस्थानी आहेत —
• एन वॉर्डमधील सर्व विभागांतील कॉन्ट्रॅक्ट कामगारांचा सविस्तर तपशील जाहीर करावा.
• या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत प्राधान्य द्यावे.
• कामगारांचे PF, ESIC, ग्रॅच्युइटी आणि कायदेशीर हक्कांची तपासणी करावी.
• कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे निर्माण होणारा अन्याय थांबवण्यासाठी स्थायी व पारदर्शक भरती प्रक्रिया सुरू करावी.
कामगार प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, ही मागणी फक्त रोजगार सुरक्षेसाठी नसून सामाजिक न्याय व संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या संविधानाच्या तत्वांनुसार कामगारांचा सन्मान राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.