ऐतिहासिक क्षण
भारताची लष्करी थिंक टॅंक म्हणून ओळखली जाणारी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (USI) च्या अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी (CMHCS ) या संस्थेच्या संचालकांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी दिल्ली येथे १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल’ साठी छत्रपती संभाजीराजे यांना निमंत्रित केले आहे.
युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (USI) हि संस्था भारताची सर्वात जुनी लष्करी थिंक-टँक संस्था म्हणून ओळखली जाते, या संस्थेची स्थापना १८७० मध्ये झाली. लष्करी सेवांमध्ये कला, विज्ञान आणि साहित्य यांबद्दल ज्ञानवृद्धी व रस निर्माण करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. तीनही लष्करी दलप्रमुख हे या संस्थेचे उपसंरक्षक आहेत आणि एकात्मिक संरक्षण दलाचे प्रमुख (CISC) हे USI परिषदेचे अध्यक्ष आहेत.
या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय लष्करी सांस्कृतिक वारशाचे विविध पैलू जतन करण्याच्या दृष्टीने, रायगड विकास प्राधिकरण व सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी एकत्रितपणे दुर्गराज रायगड आणि परिसरातील ऐतिहासिक लष्करी वारसा व्यवस्थापन धोरण,पर्यटन, शाश्वतता, जैवविविधता, पर्यटन अर्थशास्त्र, स्थानिक रोजगार इत्यादी व्यापक पैलूंवर पुढील काळात कसे काम करता येईल यावर विस्तृत चर्चा झाली.

