चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटण्याचा प्रकार, प्रलोभनाचा आरोप

मुंबई: चेंबूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या प्रयत्नात साड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात, भगवान बोडके आणि एका अनोळखी महिलेविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.



३ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना घडली. चेंबूर विधानसभा मतदारसंघातील मनपा वार्ड क्र. १५३, घाटला परिसरात, शिवशक्ती रहिवाशी संघाजवळील कर्नाटक शाळेच्या परिसरात, मतदारांना साड्या वाटून त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला समजले. ही बाब निवडणूक आयोगाच्या नियमांच्या दृष्टीने गंभीर असून, निवडणूक प्रक्रियेत मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचा आयोगाचा निर्धार आहे.


तक्रारीत उल्लेखानुसार, भगवान बोडके आणि एक अनोळखी महिला मिळून साड्यांचे वाटप करीत होते. निवडणूक आयोगाने घेतलेल्या तत्पर कारवाईनंतर, भरारी पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ साक्षांच्या आधारे गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


सदर प्रकारात गुन्ह्याच्या स्वरूपाबाबत तातडीने तपास करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून दिले गेले असून, मतदारसंघात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होण्यासाठी आयोग सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.


या प्रकरणामुळे चेंबूर मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत अधिक सतर्कता बाळगली जात असून, अशा घटनांवर पोलिसांकडून कठोर पावले उचलली जाणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने