बांगलादेशमधील असंवैधानिक सत्तापालटाच्या विरोधात घाटकोपरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा!

घाटकोपर, 8 डिसेंबर: बांगलादेशातील हिंदू आणि बौद्ध अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांच्या विरोधात आज घाटकोपर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या पुढाकाराने झालेल्या या मोर्चात स्थानिक हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला.



नजीकच्या काळात बांगलादेशात असंवैधानिक सत्तापालट झाल्यानंतर अल्पसंख्याकांवर अत्याचारांची मालिका सुरू आहे. प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध समाजातील नागरिकांना लक्ष्य करण्यात येत असून त्यांच्या धार्मिक आणि मानवी अधिकारांचा मोठ्या प्रमाणात भंग केला जात आहे.


या मोर्चाद्वारे जगाच्या नजरा या परिस्थितीकडे वळवण्यासाठी आणि पीडित अल्पसंख्याकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी जनतेने आपला आवाज बुलंद केला. मोर्चा घाटकोपरमधून सुरुवात होऊन ठरलेल्या मार्गांवरून शांततेत पुढे नेण्यात आला.


मोर्चादरम्यान विविध वक्त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य करत जगभरातील मानवाधिकार संघटनांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष देण्याची विनंती केली. या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले.


घाटकोपरमधील हा मोर्चा शांततेत पार पडला असून स्थानिक प्रशासनाने या मोर्चाला परवानगी दिली होती. यावेळी धार्मिक भावनांवर आधारित घोषणाबाजीही करण्यात आली.


संपूर्ण जगाला बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत जागरूक करण्याच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने