न्यायाचा रंग होळीच्या रंगात विरघळला?

होळीचा रंग खेळताना आनंद साजरा करणे साहजिक आहे, पण जर हे रंग सत्याच्या गाभ्याला बाधा आणत असतील तर?


संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या हत्याकांडामुळे निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील व त्याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे होळीच्या रंगात बेधुंद झाल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबत रंगाचा उत्सव साजरा करणारे अन्य व्यक्ती कोण आहेत? हा प्रश्न अधिक गंभीर आहे.


“न्यायाचा धुरा वाहणारेच संशयाच्या भोवऱ्यात”


संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांची या निलंबित पोलिसांसोबत होळी खेळताना असलेली छायाचित्रे आता चर्चेचा विषय ठरली आहेत. एका बाजूला न्यायपालिकेच्या स्वायत्ततेचा आणि पारदर्शकतेचा गजर केला जातो, आणि दुसऱ्या बाजूला न्यायाधीशच संशयित अधिकाऱ्यांसोबत रंग खेळताना दिसतात, याला काय म्हणायचे?


“याला म्हणायचे नैतिकता?”


एका गंभीर हत्याकांडाचा तपास सुरू असताना आणि आरोपींशी संबंधित अधिकारी निलंबित असताना, अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत न्यायाधीश रंग खेळताना आढळल्यास, नैतिकदृष्ट्या याला काहीच परिणाम नसतील का? हा निव्वळ योगायोग मानायचा की यात काहीतरी अधिक आहे?


लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी आणि जागरूक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जर न्यायप्रक्रियेत पारदर्शकता राखायची असेल, तर अशा सवंग आणि संशयास्पद कृती टाळल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा, न्यायही एका रंगीबेरंगी खेळात विरघळून जाईल आणि जनतेचा विश्वास ढासळेल.


“रंग खेळताना न्यायाचा तोल सुटला तर, शेवटी न्यायाच्या वस्त्रालाही डाग पडतील!”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने