मुंबईकरांवरील संकट संपता संपेना, BMC ने दिले महत्वाचे आदेश, वेळीच व्हा सावध!

 मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या आजारांचे रुग्णांची संख्या वाढली आहे. बीएमसीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून बहुतांश नागरिकांना वाट काढत घरी किंवा ऑफिसपर्यंत जावं लागलं. आता या साचलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांवर आता नवे संकट उभे राहिले आहे. मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि मलेरियासारख्या पावसाळी आजारांचा धोका वाढला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी फवारणी सुरू करण्यात आली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ऑगस्ट 2025 मध्ये पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे. 1 ते 20 ऑगस्ट या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि H1N1 सारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच आता साचलेल्या पाण्यातून चाललेल्यांना ‘लेप्टोस्पायरोसिस’ (Leptospirosis) या गंभीर आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका


जर तुमच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा खरचटलेले असेल आणि तुम्ही साचलेल्या पाण्याच्या किंवा चिखलाच्या संपर्कात आला असाल, तर तुम्हाला लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यातून चाललेल्या प्रत्येकाने २४ ते ७२ तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ‘लेप्टोस्पायरा’ (Leptospira) नावाचे सूक्ष्म जंतू दूषित पाण्यात असू शकतात, जे जखमेतून शरीरात प्रवेश करतात. लेप्टोस्पायरोसिस हा एक जीवघेणा आजार आहे. यावर वेळेवर उपचार न मिळाल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका.

पावसाळ्यात येणारा कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया किंवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो.यासाठी बीएमसीने नागरिकांसाठी मोफत तपासणी आणि औषधोपचाराची व्यवस्था केली आहे. तुम्ही जवळच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आरोग्य केंद्रे, किंवा बीएमसीच्या रुग्णालयांत जाऊन उपचार घेऊ शकता.


उपाय काय?


जर तुम्ही साचलेल्या पाण्यातून चालला असाल, तर पुढील २४ ते ७२ तासांत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच प्रतिबंधक औषधे घ्या. ही औषधे बीएमसीच्या दवाखान्यांत मोफत उपलब्ध आहेत.


पावसाळ्यात शक्यतो साचलेल्या पाण्यातून जाणे टाळा. गरज पडल्यास गमबूटचा वापर करा.


घरात आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करा.


शून्य डास मोहीम राबवण्याचे आदेश


बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी पावसाळी आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी एक विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधावर चर्चा झाली. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी ‘शून्य डास मोहीम’ राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या मोहिमेअंतर्गत, डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात सर्वत्र धूर आणि कीटकनाशक फवारणी सुरू झाली आहे. विशेषतः बांधकाम साईटवर डासांची पैदास थांबवण्यासाठी एम.एल.ओ. (MLO) ऑईलची फवारणी केली जात आहे. यासोबतच, कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने