उल्हासनगर, दि. २२ नोव्हेंबर: मालेगाव येथे घडलेल्या अमानवी आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगर-२ खेमाणी परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक येथे आज संध्याकाळी सामान्य कामगार, नागरिक आणि महिलांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संतप्त जनतेने ‘यज्ञा’ या चिमुकलीस श्रद्धांजली अर्पण करत, आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली.
या श्रद्धांजली सभेत परिसरातील अनेक कुटुंबांनी आपली मने दु:खाने भरून वाहताना व्यक्त केली. चिमुकलीवर झालेल्या निर्दयी अत्याचाराने नागरिकांत नव्या संतापाची लाट उसळली आहे. कामगार महिलांनी हातातील मेणबत्त्या पेटवून अश्रूओघांनी या बालिकेस आदरांजली वाहिली.
सभा प्रसंगी अनेकांनी आपली भावना व्यक्त करत पोलिस प्रशासनाला न्यायदानाची गती वाढविण्याची मागणी केली. विशेषतः उपस्थित लहान मुलींनीही अत्याचार करणाऱ्या आरोपीस तातडीने शिक्षा द्यावी, तो उघड्यावर भरचौकात पोलिसांनी एन्काऊंटर करावा, अशी मागणी केली. “आमच्यासारख्या मुलींना भीती वाटते, अशा लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असे एका बालिकेच्या बाईटमधून व्यक्त झाले.
या वेळी कामगार नेते ज्ञानेश्वर मरसाळे यांनीही तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की, “अशा अमानुष कृत्य करणाऱ्यांना समाजात जागा नाही. सरकार आणि पोलिसांनी उदाहरण घालून देईल अशी कारवाई केलीच पाहिजे.”
पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने हा श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रामा जाधव, आकाश खरात, रवींद्र दाभाडे, शुभम जाधव तसेच लहुजी शक्ती सेना चे कार्यकर्ते व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
न्यायाच्या प्रतीक्षेत यज्ञा बाळाचे नाव आज प्रत्येकाच्या ओठांवर होते. “त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे” — हीच मागणी प्रत्येक नागरिकाची होती. या आंदोलनाने केवळ संताप नाही तर समाजातील संवेदनशीलतेचा आणि न्यायाच्या अपेक्षेचा एक मोठा संदेश संपूर्ण शहरभर पोहोचवला आहे.