नवा संवाद
अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाची मुक्तता करा; भोंदूगिरीविरोधात नवी मुंबईत संतापाची लाट, आता मुंबईत 'विवेक जागर'
नवी मुंबई/मुंबई: नाशिक येथील भोंदूबुवा अशोक खरात याच्या अमानवीय आणि संतापजनक कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या नराधमाला कठोरतम शासन व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन तीव्र झाले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नवी मुंबई शाखेच्या वतीने २७ मार्च रोजी आयोजित निषेध सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेमध्ये केवळ निषेधच व्यक्त करण्यात आला नाही, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भोंदूंना फाशीची शिक्षा व्हावी आणि जादूटोणाविरोधी कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असा आक्रमक पवित्रा सामाजिक संघटनांनी घेतला आहे.
नवी मुंबईतील या निषेध सभेत सुमारे २४ सामाजिक संस्था, मंडळे आणि संघटनांनी एकत्र येत बुवाबाजीच्या वाढत्या प्रस्थाल चपराक लगावली. केवळ कायदेशीर कारवाई करून हे संकट थांबणार नाही, तर प्रशासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी अधिक सक्षमपणे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
समाजात पसरलेल्या दैववाद, नशीब, शुभ-अशुभ मुहूर्त आणि भविष्य यांसारख्या भ्रामक कल्पनांमुळेच सामान्यांची फसवणूक होते. हा सर्व प्रकार म्हणजे 'थोतांड' असून, जनतेने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हाच यावर एकमेव उपाय असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोणाही भोंदू व्यक्तीकडे कोणाचेही आयुष्य सुखी करण्याचा मंत्र नसून, केवळ कष्ट आणि विज्ञानावर आधारित जीवनपद्धतीच प्रगतीचा मार्ग ठरू शकते, हा संदेश या सभेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आला.
या आंदोलनाची धग आता मुंबईत पोहोचणार असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याच्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी दादर येथे व्यापक जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर (पश्चिम) स्टेशनबाहेरील सुविधा शॉपजवळ संध्याकाळी ५:३० वाजता ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
अशोक खरात प्रकरण हे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी नसून ते हितसंबंधातून जोपासल्या गेलेल्या बुवाबाजीचे जळजळीत उदाहरण आहे. राज्यातील इतरही बाबा, बुवा, फकीर किंवा पाद्री जे धर्माच्या नावाखाली लोकांची पिळवणूक करत आहेत, त्यांचा शोध घेऊन सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी या मोहिमेद्वारे केली जाणार आहे.
पोस्टर प्रदर्शन आणि थेट जनसंवादाच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम राबवली जाईल. 'नवा संवाद'च्या माध्यमातून सर्व पुरोगामी कार्यकर्ते, हितचिंतक आणि समविचारी संघटनांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्राला लाभलेला समाजसुधारकांचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी आणि समाजाला वैज्ञानिक विचारांच्या दिशेने नेण्यासाठी हे पाऊल उचलणे अनिवार्य झाले आहे. विवेक जागर संस्थांतर्गत होणारा हा लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.