प्रतिनिधी: रवींद्र दाभाडे
टिटवाळा | विशेष वृत्त
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ, टिटवाळा यांच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात वारी व भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पांढरा पारंपरिक पोशाख, गांधी टोपी, टाळ-मृदंगाचा गजर आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” तसेच “पांडुरंग हरी, विठ्ठल हरी” या अखंड नामस्मरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते, ही भगवान विठ्ठलाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वाची तिथी असून महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. याच दिवसापासून चातुर्मासालाही प्रारंभ होतो.
श्री अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा अधिक दृढ होत असून नव्या पिढीपर्यंत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे मूल्य पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना करत राज्यात सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.