प्रस्तुती रजेच्या निर्णयाचे स्वागत; वेतनवाढ व दिवाळी बोनससाठी स्वराज्य संघटनेचा लढा सुरूच – संतोष कदम

मुंबई | महाराष्ट्राचा नवा संवाद डिजिटल न्यूज

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मे. डी. एस. इंटरप्रायजेसमार्फत कार्यरत बाह्यस्रोत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. कर्मचाऱ्यांची प्रस्तुती रजा मान्य करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे स्वराज्य संघटनेने स्वागत केले आहे. मात्र, किमान वेतनवाढ, दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) आणि अन्य प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.



यासंदर्भात स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष संतोष कदम यांनी सांगितले की, प्रस्तुती रजा मान्य होणे हा कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यातील सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तथापि, केवळ निर्णय जाहीर होऊन चालणार नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक आहे.

आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेले कंत्राटी कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने सेवा बजावत आहेत. त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेऊन वेतनवाढ, दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित प्रश्न प्रशासनाने प्राधान्याने मार्गी लावावेत, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे.

“प्रस्तुती रजेचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी कर्मचाऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्या पूर्ण होणे हीच आमची भूमिका आहे. वेतनवाढ, दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत स्वराज्य संघटनेचा प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सातत्याने सुरू राहील,” असे संतोष कदम यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने