मुंबई, २५ सप्टेंबर २०२५ — महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. सनय छत्रपती शासन पक्षाने राज्यातील सर्व आगामी निवडणुका लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणाधिष्ठित शासन मॉडेल या पक्षाच्या विचारधारेचा पाया असल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केले.
प्रेस क्लब, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी ठामपणे सांगितले:
“महाराष्ट्रासाठी सत्ता नाही, तर माणसं महत्त्वाची. आजच्या राजकारणाची गरज म्हणजे लोककेंद्रित, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त शासन. आम्ही सर्व निवडणुकांत पर्याय म्हणून उभे आहोत, जो न्याय, राष्ट्रप्रेम व संवैधानिक मूल्यांवर आधारित असेल.”
प्रा. जाधव यांनी पुढे अधोरेखित केले की, “आमची उमेदवारी हक्काची नाही, तर जबाबदारीची आहे. प्रत्येक उमेदवार सुशिक्षित, प्रामाणिक आणि गुन्हेगारीविरहित असेल. सत्ता हवी म्हणून नाही, तर समाजाच्या आवाजाला खरी दिशा देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत.”
विशेष म्हणजे, पक्षाचे ५० ते १०० प्रमुख कार्यकर्ते स्वखर्चाने सिंगापूर दौरा करून तेथील प्रशासन पद्धतीचा अभ्यास करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
राष्ट्रीय महासचिव पायस वर्गीस पुल्लिकोटील यांनीही स्पष्ट संदेश दिला: “आमच्याबरोबर येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकतेला वाहिलेला असेल. आम्ही केवळ राजकारण करण्यासाठी नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीवरील विश्वास पुनःस्थापित करण्यासाठी लढा देत आहोत. आजपासून हे जनआंदोलन आहे आणि प्रत्येक सुजाण नागरिकाचं योगदान यात महत्त्वाचं आहे.”
आजच्या पत्रकार परिषदेत विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी सनय छत्रपती शासन पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाची ताकद आणि व्यापक स्वीकृती अधोरेखित झाली.
ठळक मुद्दे
- महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवण्याची ठाम घोषणा
- प्रामाणिक, पदवीधर व गुन्हेगारीविरहित उमेदवारांची हमी
- सिंगापूर दौऱ्यातून प्रशासन पद्धतीचा अभ्यास
- विविध पक्षांतून कार्यकर्त्यांचा पक्षात मोठा प्रवेश
प्रा. जाधव यांचा शेवटचा संदेश
“ही मोहीम फक्त निवडणुका जिंकण्याची नाही; सत्ता मिळाल्यानंतर पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे शासन देण्याची आम्ही शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने लोकाभिमुख, बेरोजगारीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी सनय छत्रपती शासन पक्षाच्या बरोबर यावे, हीच आमची प्रखर विनंती आहे.”
(प्रतिनिधी: रावोंद्र दाभाडे)
